Ad will apear here
Next
खरंच भारत अमेरिकेपुढे झुकला? नाही! वस्तुस्थिती तशी नाही!


जगातील किमान तीस देश आज हायड्रॉक्सिक्लोरोक्विनसाठी भारतावर अवलंबून आहेत. त्या देशांकडे असणारी मोठी शस्त्रसज्जता, जीडीपी, क्षेपणास्त्रे, रणगाडे या सर्व गोष्टी निरर्थक ठरल्या आहेत; मात्र भारताला अमेरिकेकडून धमकावले गेले, अमेरिकेपुढे भारत झुकला, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. याबाबत विश्लेषण करणारा, परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा हा लेख....
........
करोना संसर्गाने जगाला विळखा घातला आहेच. परंतु आता जगासमोर प्रश्न आहे, की या संसर्गाला नियंत्रणात कसे आणायचे. दिवसेंदिवस हा विळखा वाढतो आहे. रुग्णांची संख्या वाढतेय, मृतांची संख्या वाढतेय. अजूनही करोनावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात यश आलेले नाही. शिवाय ठोस औषधही नसल्याने तो रोखायचा कसा हादेखील प्रश्न पडला आहे. अनेक देशांमध्ये करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध देशांतील विविध संघटना परीक्षण करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनाही यासाठी प्रयत्नशील आहे.

या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर भारताचे नाव अचानक पुढे आले आहे. एक प्रभावी देश म्हणून भारताची चर्चा होत आहे. जगातील सर्वच देश भारताकडे मदत मागत आहेत. ही मदत आहे ती क्लोरोक्विनची. क्लोरोक्विन हे मलेरियावरील अत्यंत प्रभावी औषध आहे. भारत हा क्लोरोक्विनचे जगामध्ये सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे. आज जगभरातील ३० देश भारताकडे या औषधासाठी आशेने पाहत आहेत. भारताच्या मदतीवरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.

आजपर्यंत असे चित्र होते, की भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. विविध देश त्यांच्याकडील गोष्टी विकून आपला नफा कसा होईल याचा विचार करत असत; परंतु आताच्या घडीला अनेक देश भारताकडून काही तरी घेण्यासाठी येत आहेत. या देशांकडे असणारी मोठी शस्त्रसज्जता, जीडीपी, क्षेपणास्त्रे, रणगाडे या सर्व गोष्टी निरर्थक ठरल्या आहेत. एक औषधाची गोळी घेण्यासाठी आज जगात भारताशिवाय पर्याय नसल्याने अचानक भारत चर्चेत आला आहे, ही अभिमानाची बाब आहे.
असे असताना, भारताला अमेरिकेकडून धमकावले गेले, अमेरिकेकडून भारतावर टीका करण्यात आली, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (सहा एप्रिल) एक पत्रकार परिषद घेतली. अमेरिकेने काही औषधे निर्यात करणे थांबवले आहे. हा निर्णय अमेरिकेने काही दिवसांपूर्वी घेतला आहे. कारण तेथे करोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने असा प्रश्न विचारला, की अमेरिकेने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे, याबाबत अमेरिकेवर कोणी कारवाई (retaliation) करेल का? तुम्ही त्याविषयी काय धोरण ठरवले आहे? हा प्रश्न प्रामुख्याने अमेरिकेने औषधनिर्यातीवर घातलेल्या बंदीविषयी होता. त्यात भारताचा उल्लेख हा केवळ उदाहरणादाखल होता. 

ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणेच उत्तर देताना गोंधळ केला. डोनाल्ड ट्रम्प जाणीवपूर्वक आपल्यावरील प्रश्नाला बगल द्यायची म्हणून भारताच्या निर्यातबंदीच्या निर्णयाविषयी आणि मोदींच्या फोन कॉलविषयी बोलले. ‘मी रविवारीच भारताचे पंतप्रधान मोदींशी बोललो आणि ते आम्हाला पूर्ण मदत करायला तयार आहेत. या मदतीमध्ये आम्हाला प्राथमिकता देणारच आहेत; पण समजा भारताने मदत करायला नकार दिला तर ठीक आहे. प्रत्युत्तर का द्यायचे नाही,’ असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला. या उत्तरातील प्रत्युत्तर (retaliation) करू आणि प्रत्युत्तर का द्यायचे नाही, ही वाक्ये भारतीय प्रसारमाध्यमांनी उचलून धरली. ट्रम्प यांनी retaliation हा शब्दप्रयोग अमेरिकेच्या औषध निर्यातबंदीवर इतरांकडून प्रत्युत्तर का नाही मिळणार, या अर्थाने केल्याचे दिसते. तथापि याचा अर्थ भारताच्या निर्णयाचे अमेरिका प्रत्युत्तर देईल असा लावला गेला.

भारताने औषध निर्यातबंदी अंशतः उठवण्याचा निर्णय घेतला; तथापि, याचे वर्णन भारत अमेरिकेपुढे झुकला आहे असे करण्यात आले. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही, हे यातील तांत्रिक मुद्दे समजून घेतल्यास लक्षात येते.



ट्रम्प यांना विचारण्यात आलेला प्रश्न भारताच्या निर्यातबंदीबाबत नव्हताच. त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला गेला. ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तरातून त्यांचा सौदेबाजीचा स्वभाव समोर येतो. डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत तेव्हापासून आपले हित साधण्यासाठी समोरच्या देशावर प्रचंड दबाव आणणे, तो कितीही टोकापर्यंत नेणे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेणे ही त्यांची कार्य पद्धती आहे. राज्यकर्ते ट्रम्प आणि व्यापारी वृत्तीचे, अटीशर्ती ठरवणारे ट्रम्प या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन वेगळ्या छटा आहेत. जे डोनाल्ड ट्रम्प भारतात आले, आपल्याला मोटेरा स्टेडियमवर दिसले ते स्टेट्समन होते. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प हे टफ निगोशिएटर आहेत. ते हाडाचे व्यापारी वृत्तीचे आहेत. त्यांनी अनेक बाबतींत भारतावर दबाव टाकला आहे आणि बोलूनही दाखवले आहे. भारताकडून आवश्यक त्या व्यापारी गोष्टी मिळालेल्या नसल्याबाबतची नाराजी त्यांनी जाहीरपणाने मांडली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांनी ट्रम्प यांनी अमेरिकेला अनेकदा अडचणीत आणले आहे. आज जागतिक आरोग्य संघटनाही ट्रम्प यांच्या याच स्वभावामुळे काहीही ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. क्लोरोक्विनबाबत भारतावर केलेल्या वक्तव्याप्रकरणीही डोनाल्ड ट्रम्प निश्चितच चुकले आहेत.

आता प्रश्न उरतो तो भारत ट्रम्प यांच्या धमकीपुढे झुकला का? भारत हा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाचे उत्पादन करतो. मलेरियाच्या रुग्णाला हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या १४ गोळ्यांची एक पट्टी पुरेशी मानली जाते. भारत दर महिन्याला १०० टन क्लोरोक्विन तयार करू शकतो. आजघडीला आपल्याकडे जो साठा आहे, तो भारताला आठ महिने पुरू शकणारा आहे. भारत आफ्रिकेतील देशांना क्लोरोक्विन हे औषध निर्यात करतो आहे. २०१८-१९मध्ये भारताने सुमारे ४०० कोटी रुपये किमतीच्या क्लोरोक्विनची निर्यात केली आहे. त्यामुळे भारत या औषधाच्या निर्यातीतील अग्रगण्य देश आहे. परंतु आज भारतात करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत चालली आहे. त्यामुळे भारतालाही आता क्लोरोक्विनची गरज लागणार आहे. हे लक्षात घेऊन २५ मार्चला भारताने क्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

पाच एप्रिलपर्यंत भारताकडे ३० देशांनी क्लोरोक्विनसाठी मागणी केली होती. अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी तर प्रत्यक्ष मोदींना याबाबत फोन करून विनंती केली होती. त्यामुळे भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजे परकीय व्यापारविषयक निर्णय घेणाऱ्या संस्थेने याविषयी पुनर्विचार करायला सुरुवात केली होती. अमेरिकेच्या अध्यक्षांचा फोन येण्यापूर्वीच भारताने ‘आम्ही आमची गरज भागवू, मग शेजारील देशांची गरज भागवू,’ असा निर्णय घेतला होता. ‘आपली गरज भागवून अतिरिक्त साठा उरला तर त्याची निर्यात करू,’ असा निर्णय ट्रम्प यांची पत्रकार परिषद पार पडण्यापूर्वीच भारताने घेतला होता. त्यामुळेच ट्रम्प यांच्याशी चर्चेत पंतप्रधान मोदींनी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. कारण तोपर्यंत सहकार्य करण्याचा निर्णय झालेला होता. भारताचा हा निर्णय ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेनंतर जाहीर झाला, हा केवळ एक योगायोगच म्हणावा लागेल. याव्यतिरिक्त वेगळे काहीच घडलेले नाही. याचा अर्थ भारत ट्रम्प यांच्यापुढे झुकला, असा होत नाही.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZVNCL
Similar Posts
करोना विषाणू - भारताची सज्जता, सिद्धता, उपाय - पंतप्रधान मोदींचे सार्क देशप्रमुखांसमोर भाषण करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन १५ मार्च २०२० रोजी सार्क समूहातील देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली. या संदर्भातील भारताची सज्जता, सिद्धता आणि उपाय, तसेच अनुभव यांसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ...
‘अंतर’भान! आज लोकांमधील शारीरीक अंतर वाढले आहे. ती अपरिहार्यता आहे. पण त्यामुळे मनांमधील अंतर वाढणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. तरच, ‘अंतर’भान जागे आहे, असे म्हणता येईल.
जॉर्ज फ्लॉइडच्या देशा... सध्या जॉर्ज फ्लॉइडच्या दुर्दैवी हत्येने अमेरिकेचे अंतरंग पेटून उठले आहे. कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. या सगळ्या गदारोळात मुख्य प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताना कुणीही दिसत नाही. एकूणच मानवजातीचा इतिहास हा अत्यंत हीन कृत्यांनी आणि क्रौर्यानी भरलेला असाच आहे
करोनानंतरचा चीन जिथून करोना विषाणूचा प्रसार जगभर झाला, त्या विषाणूचा देशांतर्गत प्रसार रोखण्यासाठी चीनने नेमके काय केले, आत्ता चीनमधील परिस्थिती नेमकी कशी आहे, याचा वेध ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या आजच्या दुसऱ्या भागात घेण्यात आला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language